समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी
मेहकर डोणगाव : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून ५ ते ६ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.गौरव पांडे असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव असून शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) असे बसचालकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून प्रवाशांना घेऊन खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र. एमएच ०९ जीजे ७३१५) मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.०५ (मुंबई कॉरिडॉर) येथे पोहोचली असता चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बसची समोरील वाहनाला धडक बसली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दोन दुभाजकांच्या मधोमध अडकली.अपघाताची तीव्रता इतकी होती की, बसमधील प्रवासी गौरव पांडे हे बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील अन्य ५ ते ६ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले.घटनेची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून (CRO) मिळताच वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे ए. एस. मंगेश खडसे, हवालदार आराख, पोलीस कर्मचारी तसेच एमएसएफच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने जखमींना उपचारासाठी हलविले. तसेच महामार्गावर बॅरिकेडिंग करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
या अपघातप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.
शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत दुष्काळ संघर्ष यात्रेला प्रारंभ; ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशनात संघर्षाचा इशारा
मलकापूर...